April 27, 2024

पुणे: स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यटनासाठी आलेल्या ठाण्यातील तरुणाचा राजगडावरील टाकीत बुडून मृत्यू

पुणे, १५/०८/२०२३: स्वातंत्रदिनानिमित्त राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या ठाण्यातील तरुणाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

अजय मोहनन कल्लामपारा (वय ३३, रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अजय एका खासगी कंपनीत काम करत होते. याबाबत त्याचा मित्र सागर किसन माने (रा. वाशिंद, शहापूर, जि. ठाणे) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय आणि चार मित्र सोमवारी (१४ ऑगस्ट) किल्ले राजगडावर आले होते. दुपारी साडेतीन वाजता ते गडावर पोहोचले. किल्ला पाहण्यास उशीर झाल्याने रात्री अजय आणि मित्र गडावरील पद्मावती देवीच्या मंदिरात मुक्कामासाठी थांबले.

त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास सागर यांना जाग आली. तेव्हा शेजारी झाेपलेले अजय जागेवर नसल्याचे लक्षात आले. सागर आणि मित्रांनी अजय यांचा शोध घेतला. दाट धुक्यामुळे काही दिसत नव्हते. मंगळवारी (१५ ऑगस्ट) सकाळी सहाच्या सुमारास पद्मावती पाण्याच्या टाकीजवळ अजय यांची चप्पल, पाण्याची बाटली आणि बॅटरी सापडली. त्यानंतर स्थानिक रहिवासी, पर्यटकांच्या मदतीने अजय यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा अजय पाण्याच्या टाकीत पडल्याचे आढळून आले. अजय यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

त्यानंतर या घटनेची माहिती वेल्हे पोलिसांना कळविण्यात आली. सकाळी पाऊस पडत होता. गडावरील वाटही निसरड झाली होती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह गडावरुन खाली आणला. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.