October 14, 2024

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर आणखी एक गुन्हा

 पुणे, ०२/०३/२०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह ६० ते ७० कार्यकर्त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदा आंदोलन केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वकील तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन इरकल यांच्या विरुद्ध गेल्या महिन्यात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी दयानंद इरकल, पंकज पवार, शंकर डोंगरे, सुनील मुंढे, गोट्या बदामी यांच्यासह ६० ते ७० कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या महिन्यात १३ फेब्रुवारी रोजी एका वकील तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष इरकल,त्यांची पत्नी आणि साथीदार अशा चौघा जणांच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप करुन इरकल आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन पोलिसांच्या कारवाईच्या निषेध केला होता. कसबा पोटनिवडणूक निकालामुळे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. इरकल आणि साथीदारांनी बेकायदा आंदोलन करुन घोषणाबाजी केली. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्या प्रकरणी इरकल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.