June 24, 2024

पुणे: दागिने घडविण्यासाठी दिलेले सव्वा कोटींचे सोने घेऊन कारागिर पसार, सराफी व्यावसायिकांची फसवणूक प्रकरणी गु्न्हा दाखल

पुणे, ०९/०४/२०२३:  सराफी पेढीतील सव्वा कोटी रुपयांचे दागिने घेऊन कारागिर पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारागिराच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

प्रशांत सुनील सासमल (वय ४०, रा. गणेश पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत सिद्धेश ज्वेलर्सचे मालक कीर्ती चंदूलाल ओसवाल यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सासमल सोन्याचे दागिने घडवून देणारा कारागिर आहे. गेल्या काही ‌वर्षांपासून तो गुरुवार पेठ, रविवार पेठेतील सराफ व्यावसायिकांचे दागिने घडवून देत आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांचा त्याच्यावर विश्वास होता.

कीर्ती ओसवाल यांनी त्याच्याकडे एक कोटी सात लाख ५३ हजारांचे सोने तसेच मनोज ओसवाल यांनी १८ लाख ५४ हजारांचे सोने त्याला दागिने घडविण्यासाठी दिले होते. एक ते दीड महिन्यांपूर्वी त्याने सराफी व्यावसायिकांकडून सोने घेतले. त्यानंतर तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सराफ व्यावसायिक कीर्ती ओसवाल आणि मनेज ओसवाल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.

खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.