July 24, 2024

पुणे: ससून रूग्णालयातील डॉक्टरला लाच घेताना बेड्या, एसीबीची कारवाई

पुणे, ०६/०४/२०२३: दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी ससून रूग्णालयातील डॉक्टर पवण भिला शिरसाठ (43,)यांना 60 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) पथकाने बेड्या ठोकल्या. गुरूवारी ससून रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी शिरसाठ याच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 55 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
डॉ. शिरसाठ हा ससून रूग्णालयातील अस्थिव्यंग उपचार शास्त्र विभागात भौतिक उपचार तज्ज्ञ म्हणून नेमणूकीस आहे. तर तक्रारदार यांना दिव्यांग प्रमाणपत्र हवे होते.

त्यांनी याबाबत ससून रूग्णालयाकडे अर्ज केला होता. डॉ. शिरसाठ याने तक्रारदारांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील असे सांगून सुरवातीला 60 हजार रूपये व नंतर 50 हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने 3 एप्रिलला एसीबीकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शिरसाठ याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरूवारी दुपारी ससून रूग्णालयातच पथकाने सापळा रचून शिरसाठ याला 60 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. दरम्यान थेट ससून रूग्णालयातच लाचखोरीचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातून नागरिक येथे उपचारासाठी येतात. प्रामुख्याने आर्थिक परिस्थिती बेताची असलेले रूग्णच ससूनकडे धाव घेतात. त्यात त्यांना आता उपचारासाठी आणि वैद्यकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी लाच देण्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.