December 14, 2024

पुणे: तलवारीच्या धाकाने भुर्जी विक्रेत्याला धमकाविले, धनकवडीतील घटना

पुणे, दि. २६/०६/२०२३: सहकानगर परिसरातील कायदा सुव्यवस्था डळमळीत झाल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. वाहन तोडफोडीनंतर तलवारीने केक कापल्याच्या घटनेनंतर आता दोघाजणांनी धनकवडी परिसरात पुन्हा एकदा तलवारीने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अंडा-भुर्जी विक्रेत्याने ५०० रुपये उसने न दिल्याच्या रागातून दोघाजणांनी त्यांना तलवारीने धमकाविल्याची घटना २५ जूनला रात्री सात ते नउच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निशीकांत काजगर (वय २१, रा बालाजीनगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

निशीकांत यांचा अंडाभुर्जी विक्रीचा व्यवसाय असून धनकवडीत ते हातगाडी उभी करतात. २५ जूनला दोघाजणांनी त्यांच्याकडे ५०० रुपये उसने मागितले. मात्र, निशीकांतने त्यांना रक्कम देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे हल्लेखोरांनी निशीकांतला शिवीगाळ करीत हातगाडीवरील साहित्य रस्त्यावर फेकून दिले.

त्यांच्या घरात शिरुन आईला हाताने मारहाण केली. तलवार हवेत फिरवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कोणी मध्ये आलात, तर जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करीत आहेत.