May 18, 2024

पुणे: संगमवाडीत शिवशाही बसचे ब्रेक निकामी; २५ प्रवासी बचावले

पुणे, २६/०५/२०२३: शिवाजीनगरहून नगरकडे निघालेल्या शिवशाही बसचे ब्रेक निकामी झाल्याची घटना संगमवाडी परिसरात घडली. शिवशाही बस फूटपाथवर जाऊन झाडावर आदळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी स्थानकातून शिवशाही बस नगरकडे निघाली होती. बसमध्ये २५ प्रवासी होते. संगमवाडी परिसरात बिंदुमाधव ठाकरे चौकात बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पदपथावर जाऊन झाडावर आदळली.

बसचा वेग फारसा नसल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही. मात्र, बसच्या धडकेने झाड कोसळले. सुदैवाने पदपथावर कोणी नसल्याने जिवीतहानी झाली नाही.