June 24, 2024

टास्क फ्रॉडच्यामध्ये तरुणाने गमावले साडेसात लाख

पुणे, 26 मे 2023: व्हिडीओ लाईक करण्याचे टास्क देऊन सायबर चोरट्यांनी एका तरुणाला 7 लाख 69 हजार 800 रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी, कर्वेनगर येथील 23 वर्षीय तरुणाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 5 मे 2023 पासून अद्यापर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

सायबर चोरट्यांनी फिर्यादी तरुणाला व्हॉटस्अ‍ॅपद्वारे संपर्क करून पार्ट टाईम नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवले. पुढे इंस्टाग्राम खात्याला फॉलो करून त्यावरील व्हिडीओ लाईक केले तर कंपनीकडून पैसे मिळतील असे सांगितले. काही पैसे देखील तरुणाच्या खात्यात जमा केले. त्यामुळे त्याला विश्वास वाटला. त्यानंतर त्याला जाळ्यात खेचून टेलीग्राम लिंक जाईन करण्यास सांगून त्याला विविध टास्क देऊन त्याचा फायदा होत असल्याचे भासवले. यानंतर प्रिपेड टास्क देऊन तरुणाकडून 7 लाख 69 हजार रुपये साबर चोरट्यांनी ऑनलाईन भरून घेतले. काही कालावधीनंतर तरुणाला गुंतविलेले न पैसे मिळाले न मोबदला. दरम्यान गेल्या काही दिवसापासून अशा गुन्ह्यांचे शहरात मोठे प्रमाण वाढते आहे. सुशिक्षित नागरिक देखील या जाळ्यात अडकत आहेत. वारंवार सायबर पोलिसांकडून आवाहन केल्यानंतर देखील नागरिक साबर चोरट्यांच्या जाळ्यात फसत आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक डि.एस. हाके करीत आहेत.