April 13, 2024

पुणे: शहरातील विविध भागात चोरट्यांकडून घरफोडी

पुणे, दि. २०/०४/२०२३:  शहरातील विविध भागातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागदागिन्यांसह ऐवजाची चोरी केली. चार घरफोडीत ७ लाखांहून अधिक ऐवज चोरी करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १५ एप्रिलला नर्‍हेतील शार्विल सोसायटीत घडली. याप्रकरणी प्रशांत हनमघर वय ४० यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी प्रशांत हे कुटूंबियासह शार्विल सोसायटीत राहायला आहेत. १५ एप्रिलला ते कामानिमित्त घराबाहेर गेले असता, चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करीत आहेत.

राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३५ हजारांच्या रोकडसह २ लाख ८२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १९ एप्रिलला रात्री बाराच्या सुमारास लोहगावमधील गुरूद्वारा रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी हे गुरुद्वारा परिसरात राहाण्यास आहेत. १९ एप्रिलला चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून  रोकडसह २ लाख ८२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. ढावरे तपास करीत आहेत.

शिवणेतील आशिर्वाद सोसायटीतून महिला चोरट्याने दोन महिलांचे मिळून २ लाखांचे दागिने चोरुन नेले. ही घटना १८ मार्चला आशिर्वाद गार्डन आणि क्षितीज रेसीडेन्सीमध्ये घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक लुगडे तपास करीत आहेत.