July 25, 2024

पुणे: प्रचाराच्या धुराळ्यात ‘कसब्या’त घरफोड्या, तपकीर गल्लीत सात लाखांचा ऐवज लंपास

पुणे, २३/०२/२०२३: कसबा पोटनिवडणुकीतील प्रचार अंतिम टप्यात आलेला असताना गजबजलेल्या तपकीर गल्ली परिसरात चोरट्यांनी दोन सदनिका फोडून सात लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत सतीश कामतकर (वय ५२, रा. शाळीग्राम प्रसाद अपार्टमेंट, तपकीर गल्ली, ५५५ बुधवार पेठ) यांनी या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपकीर गल्ली गजबलेला भाग असून या ‌भागातील शाळीग्राम प्रसाद अपार्टमेंटमध्ये कामतकर यांची सदनिका आहे. चोरट्यांनी कामतकर यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाट उचकटले. कपाटातील पाच हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा तीन लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

याच परिसरातील आणखी एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आलेला असताना कसबा पेठ परिसरात दोन सदनिका फोडून सात लाखांचा ऐवज लांबविण्यात आल्यानेे खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.