December 13, 2024

पुणे: गुंतवणूकदारांना ऑनलाइन गंडा घालत चोरीच्या पैशातून सायबर भामटयाकडून ऑडी कारसह 24 लाखांची दुचाकी खरेदी

पुणे, २७/०४/२०२३: मागील  दोन ते तीन वर्षापासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. वेगवेगळ्या योजनांच्या आमिषाने गुंतवणूकदारांना दररोज लाखो रुपयांचा गंडा सायबर भामटे घालत आहे.अशाच एका सायबर गुन्ह्यात तब्बल तीन कोटींची फसवणूक केलेला सायबर भामटा राहुल राठोड याने ऑडी या आलिशानकारसह तब्बल 24 लाखांची ‘ डुकेती ‘दुचाकी खरेदी केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आला आहे, त्यामुळे पोलिसांनी संबंधित दोन्ही गाड्या जप्त केल्या आहेत.

यापूर्वीही पुणे सायबर पोलिसांनी बिटकॉइन घोटाळा प्रकरण माजी आयपीएस अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीचा अधिकारी रवींद्र पाटील याच्याकडून सायबर गुन्हेगारीतून मिळवलेल्या पैशातून खरेदी केलेली बीएमडब्ल्यू ही आलिशान कार जप्त केलेली आहे. ऑनलाइन गैरव्यवहाराचे प्रकार वाढू लागल्याने त्याचा गैरफायदा सुशिक्षित म्हणून घेणारे तज्ञही घेत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी राहुल राठोड हा क्रिप्टो बीझ ट्रेडिंग प्राइवेट लिमिटेड कंपनीचा मालक असून त्यानी देशभरातील गुंतवणूकदारांना कंपनीच्या विविध स्टेकिंग प्रोग्रॅम मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यापैकी 44 जणांची तब्बल दोन कोटी 94 लाखांची फसवणूक आत्तापर्यंत उघडकीस आली आहे.पोलिसांनी राठोड याच्या बँक खात्यातील 28 लाख रुपये तसेच क्रिप्ट वॉलेट मधील तीन लाखांचे पॉईंट्सही जप्त केले आहेत.

राठोड याची पत्नी मूळची थायलंड देशातील रहिवासी असून तिच्या परदेशातील बँक खात्यावर अथवा परदेशात आरोपीने काही गुंतवणूक केली आहे का? मालमत्ता खरेदी केली का? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राठोड याने त्याचा मॅनेजर ओमकार सोनवणे यास ही फसवणुकीचा कटात सहभगी करून घेत त्यास पागरा सोबत वेगवेगळे कमिशन देऊन परदेशवारी घडवून आणल्याचे ही पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपींवर तेलंगणा, हरियाणा , दिल्ली आदी ठिकाणी आता गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्या आहे.