November 2, 2024

पुणे: कोयत्याचा धाक दाखवत ४७ लाखांची रोकड लंपास

पुणे, २४/०३/२०२३: रास्ता पेठ आझाद अळी मध्ये भरदिवसा एका दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एकास धारदार कोयत्याचा धाक दाखवून तब्बल ४७ लाख रुपयांची रोकड पळून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे.

याप्रकरणाची माहिती होताच, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. संबंधित मोटरसायकल चोर नेमके कोण होते याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, या अनुषंगाने पोलीस पथके आरोपींचा शोध घेत आहे. घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत, आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रक्कम ही पुण्यातील एका सिगरेट व्यवसायिकाची होती. व्यवसायत जमा झालेले ४७ लाख २६ हजार रुपये घेऊन व्यावसायिकाचा एक व्यक्ती रास्ता पेठेतील इंडिया बँक या ठिकाणी सदर रकमेचा भरणा करण्यासाठी दुचाकी वर जात होता. त्यावेळेस अज्ञात दोन जणांनी त्यास अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन संबंधित रक्कम लुटून नेली आहे. सदर आरोपींबाबत अद्याप ओळख पटलेली नसून त्या अनुषंगाने पोलीस पथके तपास करत आहेत.