October 3, 2024

पुणे: महाविद्यालयीन युवकाला सायबर चोरट्यांकडून गंडा

पुणे, २८/०३/२०२३: शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाला सायबर चोरट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. बँकेतून बोलत असल्याच्या बतावणीने चोरट्यांनी क्रेडीटकार्डची गोपनीय माहिती घेऊन खात्यातून एक लाख ६८ हजार रुपयांची रोकड लांबविली.

याबाबत एका १९ वर्षीय युवकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवक मूळचा मुंबईतील असून तो पुण्यात शिक्षण घेत आहे. विमानगर भागातील एका वसतीगृहात तो राहायला आहे. त्याच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. क्रेडीट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. महाविद्यालयीन युवकाने चोरट्यांना क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती दिली. चोरट्यांनी त्याच्या खात्यातून एक लाख ६८ हजार रुपये लांबविले.

ही बाब त्याने आई-वडिलांपासून लपवून ठेवली होती. युवक मुंबईला गेला. त्याने या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याने तक्रार नोंदविली. संबंधित गुन्हा तपासासाठी विमानतळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक संगीता माळी तपास करत आहेत. .