पुणे, दि. २८ मार्च २०२३ : पुण्यात संपन्न झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धेत महिलांमध्ये केरळ राज्याच्या संघाने २९ गुण मिळवत विजेतेपद पटकावले, तर पुरुषांमध्ये सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) संघ ३४ गुण मिळवत ठरला विजेतेपदाचा मानकरी.
भारतीय तलवारबाजी महासंघातर्फे महाराष्ट्र तलवारबाजी महासंघ व डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, आकुर्डी, पुणे’च्या सहकार्याने पुण्यात ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी (फेंसिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाळुंगे–बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये २५ ते २८ मार्च या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा सांगता समारोह आज ( दि. २८) संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी २०२२ च्या समर पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळातील पुरुष एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक विजेते खेळाडू प्रमोद भगत, डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, आकुर्डी, पुणे’चे उप-कुलगुरू डॉ प्रभात रंजन, विद्यापीठाचे कॅम्पस संचालक रेअर अॅडमिरल अमित विक्रम ( नि.), आशियाई पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळातील विजेते असलेले खेळाडू शुकांत कदम, भारतीय तलवारबाजी महासंघाचे सचिव राजीव मेहता, कोषाध्यक्ष बशीर अहमद खान,ज्येष्ठ सल्लागार अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी महासंघाचे सचिव उदय डोंगरे, महाराष्ट्र तलवारबाजी संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, डी वाय पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बी डी कोटकर हे उपस्थित होते.
या राष्ट्रीय स्पर्धेत ईपी, फॉईल आणि सॅबर या प्रकारात विविध पदक मिळवित सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या संघास स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले. स्पर्धेत महिला गटात केरळच्या संघाने सर्वाधिक २९ गुण मिळवत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. हरियाणा संघाने २० गुणांसह द्वितीय क्रमांक तर तामिळनाडू संघाने १५ गुणांसहित तृतीय क्रमांक मिळविला.
तर पुरुष गटात एसएससीबी संघाने ३४ गुण मिळवित स्पर्धेचे राष्ट्रीय विजेते ठरले. मणिपूर संघाने २१ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश संघानी प्रत्येकी ७ गुण मिळवित तृतीय क्रमांकाचे संयुक्त मानकरी ठरले.
दरम्यान स्पर्धेत पुरुष सॅबर वैयक्तिक प्रकारात राजस्थानचे तलवारबाज करण सिंघ गुर्जर यांनी महाराष्ट्राचे अभय शिंदे यांचा १५-९ गुणांनी पराभव करत, वरिष्ठ पुरुष सॅबर स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत गुर्जर यांनी सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड’च्या (एसएससीबी) जीशो निधी कुमारेसन पद्मा यांच्यावर १५-१४ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत अभय शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरच्या विशाल थापर यांचा १५-१४ असा पराभव केला. स्पर्धेत अभय शिंदे यांना रौप्य पदक तर थापर आणि जीशो यांना संयुक्तपणे कांस्यपदक देण्यात आले.
पुरुष सॅबर (सांघिक) प्रकारात एसएससीबी संघाने पंजाब संघाचा ४५- २९ गुणांनी पराभव करून सुवर्णपदक पटकावले. उपांत्य फेरीत पंजाबने महाराष्ट्राचा ४५-४० असा पराभव केला, तर एसएससीबी संघाने जम्मू-काश्मीर संघाचा ४५-२३ असा पराभव केला.
वरिष्ठ पुरुष सांघिक इपी प्रकारात मणिपूर संघाने अंतिम फेरीत मध्यप्रदेश संघाचा ४५-३६ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. उपांत्य फेरीत मणिपूर संघाने तेलंगणा संघाचा ३०-२८ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत मध्यप्रदेश संघाने हरियाणाचा ४५-३७ असा पराभव केला. मणिपूर संघात चिंगाखम जेटली, भिवेकर गुरुमायुन, अमर खोमांथनहोम आणि सतीश थोंगम यांचा समावेश होता.
वरिष्ठ सांघिक महिला इपी प्रकारात, हरियाणा संघाने केरळ संघाचा ४५-३१ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. हरियाणा संघात शीतल दलाल, तन्नू गुलिया, तनिक्षा खत्री आणि प्राची लोहान यांचा समावेश होता. तर केरळ संघात केपी गोपिका, केव्ही अनुश्री, एमएस ग्रेशमा आणि राज पीके अस्वथी यांचा समावेश होता. स्पर्धेत केरळ संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या उपांत्य फेरीत हरियाणा संघाने पंजाब संघाचा ४५-३० असा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत केरळ संघाने चंदीगड संघाचा ४५-३८ असा पराभव केला.
वरिष्ठ सांघिक महिला फॉइल प्रकारात, मणिपूरने अंतिम फेरीत केरळचा ४५-४४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मिना नाओरेम, अनिता फांडोम, थोईबी देवी आणि सोनिया वायखोम या खेळाडू सुवर्णपदक विजेत्या मणिपूर संघात सहभागी होत्या. मणिपूरने उपांत्य फेरीत गुजरातचा ४५-३५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती, तर अन्य उपांत्य फेरीत केरळने महाराष्ट्राचा ४५-२६ असा पराभव केला होता.
फेरीनिहाय निकाल :
पुरुष सॅबर (वैयक्तिक)
उपांत्य फेरी
– करणसिंघ गुर्जर वि. वि. जीशो निधी कुमारेसन पद्मा (१५-१४) असा पराभव केला
– अभय शिंदे वि. वि. विशाल थापर (१५-१४)
अंतिम फेरी
करणसिंघ गुर्जर वि. वि.अभय शिंदे ( १५-८)
पुरुष ईपी ( सांघिक)
उपांत्य फेरी
– मणिपूर वि. वि. तेलंगणा (३०-२८)
– मध्यप्रदेश वि. वि. हरियाणा (४५-३७)
अंतिम फेरी
मणिपूर वि. वि.मध्य प्रदेश (४५-३६)
पुरुष सॅबर (सांघिक)
उपांत्य फेरी
पंजाब वि.वि. महाराष्ट्र (४५-४०)
एसएससीबी वि.वि.जम्मू-काश्मीर (४५-२३)
अंतिम फेरी
एसएससीबी वि.वि.पंजाब (४५-२९ )
महिला ईपी ( सांघिक )
उपांत्य फेरी
– हरियाणा वि. वि. पंजाब (४५-३०)
– केरळने वि. वि. चंदीगड (४५-३८)
अंतिम:
हरियाणा वि. वि. केरळचा (४५-३१)
महिला फॉइल (सांघिक)
उपांत्य फेरी:
केरळ वि. वि. महाराष्ट्र (४५-२६)
मणिपूर वि. वि.गुजरात (४५-३५)
अंतिम:
मणिपूर वि. वि.केरळ ( ४५-४४)
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर