पुणे, दि. २६/०२/२०२३: मतदानासाठी पैसे वाटपावरुन झालेल्या वादातून दोन गटात गंज पेठेत वाद झाल्याने त्यांच्यात हाणामारीत झाले. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परस्पर विरोधी फिर्यादीनंतर दोन्ही गटातील २५ ते ३० जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे गंजपेठेत तणाव निर्माण झाला. मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्ते गंज पेठ चौकीसमोर जमा झाले होते.
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर, निर्मल हरिहर, हिरा हरिहर यांच्यासह १५ ते १६ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीता किशन शिंदे (वय ४२, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी नीता शिंदे शनिवारी रात्री घरी असताना विष्णू हरिहर आणि १५ ते १६ जण गंज पेठेत आले. पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन आरोपींनी नीता यांचा भाऊ कुणालला धक्काबुक्की केली. तुला माज आलाय का, तुझ्या घरी खायला नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी शिंदे यांच्या मावशीला धक्काबुक्की केली. शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर रविवारी पहाटे गुन्हा दाखल झाला.
भाजपचे हिरालाल नारायण हरिहर (वय ६७, रा. गंज पेठ) यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हिरालाल हरिहर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता सावधान मित्र मंडळाजवळ मारुतीचे दर्शन घेऊन घरी जात होते. त्यावेळी विशाल कांबळे याने इकडे कशाला आलास, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. हरिहर त्यांना समजावून सांगत असताना कांबळे आणि साथीदारांनी त्यांना पटांगणात नेऊन फळीने मारहाण केली. दरम्यान, पैसे वाटपावरुन दोन गटात झालेल्या वादावादीनंतर गंज पेठेत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त मागवून घेतला होता.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान