May 6, 2024

पुणे: मतमोजणी शांततेत, पोलिसांकडून चोख बंदोबस्त

पुणे, दि. ०२/०३/२०२३: मतमोजणीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांकडून कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामासह मध्यभागासह मध्यवर्ती ठिकाणांवर अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा  ७०० हून जादा मनुष्यबळ तैनात केले होते.  पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेषतः मतमोजणी केंद्र असलेल्या कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्नधान्य महामंडळ गोदामासह  कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, कासेवाडी  परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्याशिवाय शहरात संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती. विशेष शाखा,  गुन्हे शाखेतील पोलिसांची पथकांसह स्थानिक पोलिसांकडून पायी पेट्रोलिंग करीत कायदा सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यावर भर दिला. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे.

व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवरही ठेवली नजर
मतमोजणीच्या अनुषंगाने सोशल मीडियाचा गैरफायदा घेत दोन गटात वादावादी होणार नाही. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या सोशल मीडिया विभागानेही खबरदारी घेतली होती. व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकसह सोशल मीडियावरही  पोलिसांनी नजर ठेवली होती. तसेच सायबर गुन्हे शाखेचे पथकांकडून वॉच ठेवण्यात आला.  गैरप्रकार, तसेच आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्याशिवाय कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.