December 14, 2024

पुणे: येरवडा कारागृहात मोबाइल बाळगणाऱ्या सात कैद्यांवर गुन्हा

पुणे, ०२/०७/२०२३: येरवडा मध्यवर्ती कारागृहात मोबाइल बाळगल्या प्रकरणी सात कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा कारागृहात कैद्यांसाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना सुरू करण्यात आल्यानंतर चार मोबाइल संच कारागृहाच्या भिंतीत लपविल्याचे उघडकीस आले होते. कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सात कैद्यांनी छुप्या पद्धतीने चार मोबाइल संच आणल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी प्रवीण श्रीनिवास महाजन, मयूर राजू सपकाळ, कुमार बलभीम लोहार, शाम दत्तात्रय सरक, राहुल हरी घडाई उर्फ कोळी,स रोहन अनिल देडगे, ओंकार ईश्वर सुपेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह अधिकारी तुरुंग रेवणनाथ कानडे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेले कैदी न्यायाधीन बंदी (शिक्षा न झालेले) आहेत. कारागृहातील सर्कल क्रमांक एकमधील बराकीतील काही कैदी मोबाइल वापरत असल्याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळाली होती.

कारागृह रक्षकांनी चौकशी सुरू केली. तपासणीत प्रवीण महाजन याच्याकडे मोबाइल सापडला. महाजन याची चैाकशी करण्यात आली. तेव्हा कारागृहातील महाजनचे साथीदार मोबाइल चा वापर करत असल्याचे उघडकीस आले. महाजन याने दोन वर्षांपूर्वी बुधवार पेठेत एका पोलीस हवालदारावर शस्त्राने वार करुन खून केला होता.