December 14, 2024

पुणे: धार्मिक गृहीकरणांच्या अफवांना बळी पडू नये

पुणे, ०६/०६/२०२३: लव जिहाद व इतर कारणांसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून शहरात काढल्या जाणाऱ्या मोर्चाद्वारे अल्पसंख्यांक विरोधी वातावरण तयार करून धार्मिक ध्रुवीकरण केले जात असल्याने अशा प्रकारची कोणतीही कृती होऊ देऊ नये याबाबतची विनंती आज अल्पसंख्यांक समाजाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच संघटना प्रमुखांनी पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

“पुणे शहराचा संस्कार हा सर्वसमावशकतेचा व धर्मनिरपेक्ष विचारांचा असून देशात कुठेही काहीही झाले तरी शहरात मध्ये मात्र कायम सलोखा राखला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी धार्मिक धुंदीकरणाच्या कोणत्याही कार्यक्रमांना व अफवांना बळी पडू नये“ असे आवाहन शिष्टमंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले.

दरम्यान केवळ मुस्लिम विरोधी वातावरण तयार करणे व त्याद्वारे मतांचे राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न या मोर्चाद्वारे होत असल्याने , देशाचे व्यापक हित लक्षात घेऊन मुस्लिमांची व अन्य कोणत्याही धर्म बांधवांची बदनामी करू नये असे आव्हान देखील यावेळी करण्यात आले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये माजी आमदार मोहन जोशी , माजी नगरसेवक रशीद शेख , नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे , माजी नगरसेवक फिरोज शेख , रईस सुंडके , ॲड. गफूर पठाण , हनीफ शेख , मंजूर शेख , वंचित चे शहराध्यक्ष मुनवर कुरेशी , सामाजिक कार्यकर्ते जाहिद शेख , श्रीमती हसीना इनामदार, अनिल हातागळे , एम आय एम चे शाहिद शेख , इक्बाल शेख , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीर शेख , रिपब्लिकन पक्षाचे वसीम पहिलवान, एन सी एम चे जुबेर मेमन, आदी पदाधिकारी यात सहभागी झाली होती.

शिष्टमंडळाला बोलताना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्पष्ट आश्वासन दिले की “शहरांमध्ये कायदा – सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही बाबी खपवून घेणार नाही व तसा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करू.“