May 16, 2024

पुणे: मालमत्तेच्या वादातून घरात स्फोटके ठेवल्याची खोटी तक्रार, तक्रारीमुळे पोलिसांची धावपळ

पुणे, ११/०८/२०२३: खडकी भागातील घरात स्फोटके लपवून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना एकाने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घरात स्फोटके सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी घराची तपासणी केली. तेव्हा बाँम्बसदृश वस्तू सापडली. चौकशीत एकाने मालमत्तेच्या वादातून खोटी तक्रार दिल्याचे उघडकीस आले आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पोलीस कर्मचाऱ्यास एका घरात स्फोटके लपवून ठेवण्यात आल्याची माहिती एकाने दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी बाँम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) दाखल झाले. राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तेथे पोहोचले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने याबाबतची माहिती देण्यात आली. खडकीतील घराभोवती मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाँब शोधक नाशक पथकाने घराची तपासणी केली. तेव्हा घराच्या छतावर ॲल्युमिनअमचे कोन आणि इलेक्ट्रीक वायर सापडली. ज्या व्यक्तीने गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यास माहिती दिली होती. त्याची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा मालमत्तेच्या वादातून धडा शिकवण्यासाठी एकाच्या घरात स्फोटके ठेवण्यात आल्याची खोटी तक्रार पोलिसांना दिल्याचे त्याने सांगितले.

खडकीतील घराची पोलिसांनी पाहणी केली. घरात स्फोटके किंवा बाँम्बसदृश वस्तू सापडली नाही. संशयास्पद काही आढळून आले नाही, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.