February 28, 2024

पुणे: येरवडा कारागृहात कैद्यातील दोन गटात भांडणे, सहा कैदावर गुन्हा दाखल

पुणे, ०२/०४/२०२३: येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात पूर्ववैमन्यासातून बेदम मारहाणीचा प्रकार घडला आहे. या भांडणात दोन न्यायालयीन कैदी जबर जखमी झाले असून त्यांच्यावर करागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आला. हरीराम गणेश पांचाळ  आणि मुसा अबू शेख असे जखमी झालेल्या कैद्यांची नावे आहेत अशी माहिती पोलिसांनी  दिली आहे.

याप्रकरणी येरवडा कारागृह शिपाई एकनाथ गांधले  यांनी  फिर्याद  दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयीन कैदी अर्जुन बाजीराव वाघमोडे , ओंकार नारायण गाडेकर, रोहन रामोजी शिंदे , साहील लक्ष्मण म्हेत्रे , ऋषिकेश हनुमंत गडकर ,  मंगेश शकील सय्यद  यांच्यावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक दोनच्या जवळील हौदाजवळ ३१ मार्च रोजी सकाळी पावणेदहा वाजता घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडणात अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर व इतरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कैदी म्हणून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येऊन किशोर विभागात त्यांना ठेवण्यात आले आहे. विभागात इतरही न्यायालयीन कैदी बंदिस्त आहेत. हरीराम पांचाळ व मुसा अबू शेख यांच्या सोबत या आरोपीची भांडणे झाले होती. याच भांडणाचा राग मनात धरुन कैदी अर्जुन वाघमोडे व इतरांनी तेथील प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघा कैद्याना बेदम मारहाण केली. कारागृह शिपायांना याबाबतची माहिती समजल्यावर त्यांनी पांचाळ व शेख यांना तातडीने बाजूला हलवले.  दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून याबाबत पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे.