May 12, 2024

पुणे: हडपसरमधी रामटेकडी वसाहतीतील गॅस गळती झाल्याने आग, अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

पुणे, २४/०६/२०२३: हडपसर भागातील रामटेकडी वसाहतीत एका घरात स्वयंपाकाच्या गॅसमधून गळती होऊन आग लागली. आगीत गृहापयोगी साहित्य जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आग आणल्याने अनर्थ टळला.

हडपसर भागातील रामटेकडी वसाहत भागात दाट लोकवस्ती आहे. वसाहतीतील दाटीवाटीने घरे आहेत. आंबेडकर मित्र मंडळाच्या शेजारी घरामध्ये शाबाबाई परमेश्वर ठोसर स्वयंपाक करत होत्या. त्या वेळी गॅस सिलिंडरमधून अचानक गळती सुरू झाली. आग लागल्याचे समजताच प्रसंगावधान राखून त्या घराबाहेर पळाल्याने बचावल्या. काही क्षणातच आगी भडकली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या हडपसर केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन २० मिनिटात आग आटोक्यात आणल्याने शेजारी असलेल्या घरांना आगीची झळ पोहोचली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीत गृहोपयोगी साहित्य जळाले. जवानांनी गॅस गळती रोखली.

हडपसर अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, जवान संजय जाधव, नितेश सगळे, अमित सरोदे आदींनी आग आटोक्यात आणली. वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गिरमकर, उपनिरीक्षक माया गावडे घटनास्थळाची पाहणी केली. आग लागल्यानंतर या भागात गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवली.