May 15, 2024

पुणे: बनावट डेबिट कार्डचा वापर करु एक कोटी रुपयांची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

पुणे, २८/०७/२०२३: बँक खातेदारांची बनावट डेबिट कार्ड (क्लाेन) करुन सायबर चोरट्यांनी भारती सहकारी बँकेची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सायबर चोरट्यांनी मुंबई, पुणे, दिल्लीसह, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रातून बनावट डेबिट कार्डचा वापर करुन खातेदारांचे पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत भारती सहकारी बँक लिमिटेडचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील (वय ६२) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भारती सहकारी बँकेची मुख्य शाखा सदाशिव पेठेत आहे. सायबर चोरट्यांनी डिसेंबर २०२० ते २०२१ या कालावधीत बनावट डेबिट कार्ड (क्लोन) तयार करुन पुण्यातील सदाशिव पेठ, धनकवडी, धानोरी, आकुर्डी, कोथरुड, बाणेर, हडपसर, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, मुंबईतील वरळी, तसेच दिल्लीतील एटीएम केंद्रातून भारती सहकारी बँकेच्या खात्यातून एक कोटी आठ लाख १५ हजार ७०० रुपये लांबविले. सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी ४३९ बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

बनावट एटीएम कार्डद्वारे १२४७ व्यवहार करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वरुरे करत आहेत. काॅसमाॅस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करुन काॅसमाॅस बँकेची एकूण मिळून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना ऑगस्ट २०१८ मध्ये घडली होती.