September 14, 2024

पुणे: महिला वसतीगृहात प्रवेश करण्यास रोखल्याने व्यवस्थापकास बेदम मारहाण

पुणे, १८/०२/२०२३ : खासगी महिला वसतीगृहात प्रवेश करण्यास रोखल्याने घरपाोहोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या एका कंपनीतील कामगाराने साथीदारांसह वसतीगृहाच्या व्यवस्थापाकास बेदम मारहाण केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली.

या प्रकरणी राेहन बाळू याच्यासह सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश बाळासाहेब साबळे (वय २७, रा. सुनीतानगर, वडगाव शेरी) याने या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरी भागातील आदर्शनगर परिसरात स्मार्ट लिव्ह इन पीजी वसतीगृह आहे. वसतीगृह महिलांसाठी आहे. साबळे वसतीगृहात व्यवस्थापक आहे. आरोपी रोहन घरपोहोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या कंपनीत डिलीव्हरी बाॅय आहे. रोहन खाद्यपदार्थ घेऊन वसतीगृहात आला होता. त्याला वसतीगृहात प्रवेश करण्यास व्यवस्थापक साबळे आणि सुरक्षारक्षक दीपक मंडल यांनी रोखले.

आरोपी रोहनने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे साबळेने रोहनच्या कानाखाली मारली. रोहन तेथून निघून गेला. काही वेळानंतर रोहन आणि सहा साथीदार वसतीगृहात शिरले. त्यांनी दांडक्याने साबळेला बेदम मारहाण केली. साबळेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.