July 22, 2024

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, 18 फेब्रुवारी 2023: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी आणि चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षणार्थींना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी असे त्यांनी सांगितले.

निवडणूक प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत असून पहिले प्रशिक्षण १२ फेब्रुवारी रोजी देण्यात आले.

दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रकिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी प्रत्यक्ष निवडणूक विषयक कामकाजात येणाऱ्या अडचणींविषयी मार्गदर्शन केले. सेक्टर अधिकारी किरण अंदूरे यांनी विविध रकान्यांची तपशीलवार माहिती दिली.

चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत नावे असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी मतदान सुविधा कक्ष स्थापन करण्यात आला होता. टपाली मतदानासाठी आवश्यक असणारे फॉर्म वितरण आणि स्वीकृतीची सोय येथे करण्यात आली. टपाली मतदान कक्ष याठिकाणी उभारण्यात आला होता.