May 18, 2024

पुणे: आमदार शिरोळे यांनी केली विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल कामाची पाहणी

पुणे, १०/०१/२०२४- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामास गती मिळावी, वाहतूक कोंडी होऊ नये यादृष्टीने नियोजन करण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी सकाळी कामाची पाहाणी केली.

मेट्रोचे काम करणारी टाटा कंपनी, महापालिकेचा पथ विभाग आणि वाहतूक पोलिस अधिकारी आमदार शिरोळे यांचेसमवेत होते. विद्यापीठ चौकालगत असलेल्या खांबाची उभारणी व उड्डाणपुलाच्या रँम्पचे काम १५ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे, तर फेब्रुवारी मध्ये चौकाच्या मध्यभागी खांब उभारणी सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या पोलीस प्रशासन १५ जानेवारीपर्यंत देईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या बरोबरच जुन्या पुणे – मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावाही आज (बुधवारी) घेण्यात आला. रस्ता रुंदीकरणाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू आहे. हा रस्ता दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जड वाहनांसाठी खुला करण्यात येईल त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.