April 28, 2024

पुणे: मोटार वाहन न्यायालयाकडून पकड वॉरंट जारी, वाहतूक विभागाला ७३२ जणांचे वॉरंट प्राप्त

पुणे ,दि. २१/०७/२०२३: नागरिकांनो सावधान तुम्ही जर वाहतूक उल्लंघन केल्याप्रकरणी दंड थकविला असल्यास तुम्हाला अटक होऊ शकते. यासंदर्भात मोटार वाहन न्यायालयाने संबंधित वाहन धारकांवर पकड वॉरंट जारी केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वाहतूक विभागाला ७३२ जणांचे वॉरंट प्राप्त झाले आहे. त्यामुळे पकड वॉरंटमधील वाहनधारकांनी ८ दिवसांच्या आतमधे मोटार वाहन न्यायालयात उपस्थित होवून खटल्यासंबंधी निकाल लावून घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला अटक करून कोर्टासमोर हजर करावे लागणार आहे, असा इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अनेकांनी दंड जमा केला नाही. त्यामुळे मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहतूक विभागाने २०२० पासून न्यायालयासमोर वेळोवेळी उपस्थित राहिले नसलेल्या वाहनधारकांवर मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. दाखल खटल्यांचे अनुषंगाने कोर्टाने संबंधितांना वेळोवेळी कायदेशीर प्रक्रियाव्दारे यापुर्वीच कळविले होते. तरीसुध्दा अद्यापपर्यंत वाहनधारकांनी वाहतूक विभागामध्ये अथवा कोर्टामध्ये तडजोड केली नाही, अशा केसेस मोठया प्रमाणात कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. याकरीता मोटार वाहन न्यायालयाने संबंधित वाहनधारकांवर पकड वॉरंट जारी केले आहे. मोटार वाहन न्यायालयाकडून पहिल्या टप्प्यामध्ये ७३२ वॉरंट वाहतूक विभागास प्राप्त झाले आहेत.

नागरिकांनो तुम्हाला दंड जमा करण्यासाठी ८ दिवसांची मुदत

मोटार वाहन न्यायालयाने वाहतूक विभागाला जारी केलेल्या पकड वॉरंट मधील संबंधित वाहनधारकाना दंड जमा करण्यासाठी वाहतूक विभागाने ०८ दिवसांचा कालावधी दिला आहे.

त्यावेळेस संबंधित थकीत दंड वाहन चालकाने मोटार वाहन न्यायालयात उपस्थित होवून खटल्यासंबंधी निकाल लावून घेणे गरजेचे आहे. अन्यथा पोलीस विभागाकडून संबंधितास पकड वॉरंटव्दारे अटक करून कोर्टासमोर हजर करावे लागणार आहे.
त्यामुळे वाहनधारकांनी / वाहनचालकांनी आपले वाहनावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत प्रलंबित असलेली तडजोड मा. न्यायालयात त्वरीत जमा करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.