पुणे, २८/०२/२०२३: कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (२ मार्च) कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.
मतमोजणी केंद्र परिसरात शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्र परवाना असलेल्या व्यक्तींना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस, संरक्षण दल, कारागृह विभाग, बँक सुरक्षा विभाग तसेच केंद्रीय आणि राज्य शासनाचे अधिकारी यांना शस्त्र बाळगण्याबाबत दिलेल्या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल संच, बिनतारी दूरध्वनी यंत्रणा (काॅर्डलेस फोन) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांना ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मनाई करण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.
मतमोजणी केंद्र परिसरात कोणताही मजकूर लिहिण्यास किंवा छापील मजकूर चिटकवण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय वाहने सोडून अन्य वाहनांना या परिसरात प्रवेश देण्यात येणार नाही तसेच मतमोजणी केंद्रात अधिकृत परवानगी पत्र (पास) असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणू काढण्यात मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील