June 14, 2024

‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पुणेकरांची भरारी; २० लाखांवर वीजग्राहकांचा ५६५ कोटींचा भरणा

पुणे, दि. ०५ जून २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या मे महिन्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर २० लाख १५ हजार लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे ५६४ कोटी ९९ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे भरणा केला आहे.

पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिल ते सप्टेंबर २०२२पर्यंत लघुदाब वर्गवारीतील सरासरी १७ लाख ४१ हजार ८६० वीजग्राहक दरमहा ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा करीत होते. ही संख्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२पर्यंत १८ लाख ६४ हजार ८२० वर गेली. त्यानंतर जानेवारी ते मे २०२३ पर्यंत सरासरी दरमहा ग्राहकांची संख्या २० लाख २१ हजार १३० वर गेली आहे. ‘ऑनलाइन’ बिल भरण्यास पुणे परिमंडलामध्ये वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीजग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या मे महिन्यात पुणे शहरातील ११ लाख ३० हजार २२५ लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी ३१२ कोटी ८७ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक १ लाख ९१ हजार ९१३ ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये सरासरी १ लाख ५६ हजार ३८५ वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्यात लघुदाब ५ लाख २८ हजार ६४ ग्राहकांनी १४९ कोटी १० लाखांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहर आघाडीवर आहे. गेल्या महिन्यात या शहर अंतर्गत पिंपरी विभागातील ३ लाख ८ हजार ११६ तर भोसरी विभागातील २ लाख १९ हजार ९४८ ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद वाढला आहे. यात गेल्या महिन्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ३ लाख ५६ हजार ९४५ ग्राहकांनी १०३ कोटी २ लाख रुपयांचा सुरक्षितपणे भरणा केला आहे.

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.

लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. विशेष म्हणजे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच संबंधीत ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार – पुणे परिमंडलातील वीजग्राहकांची ‘गो-ग्रीन’ योजनेत व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात राज्यामध्ये आघाडी कायम आहे. ‘गो-ग्रीन’मध्ये इमेलद्वारे प्राप्त झालेले वीजबिल तसेच ‘ऑनलाइन’ भरणा केलेली पावती मोबाईल किंवा संगणकात जतन करून ठेवता येते व कधीही प्रिंट काढता येते. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद द्यावा.