May 18, 2024

पुणेकरांना मिळणार प्लांट ट्रकची सेवा

पुणे, दिनांक ११ ऑक्टोबर, २०२३ : नैसर्गिक हिरवाईचे मानवाला कायमच आकर्षण राहिले आहे. घराच्या आजूबाजूला फुलवलेली बाग हे त्याचे एक उत्तम उदाहरण. वाढत्या शहरीकरणामुळे बंगल्याची जागा फ्लॅटने घेतली आणि घराच्या समोरील बागेची जागा टेरेस गार्डनने. हौसेने तयार केलेले हे टेरेस गार्डन बऱ्याचदा गरजेच्या व वेळेत कराव्या लागणाऱ्या देखभाली अभावी कोमेजून जाते. यावर उपाय म्हणून कर्वे रस्त्यावरील बायोफिलिया या संस्थेने होम गार्डन किंवा टेरेस गार्डन यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा घरपोच देण्याच्या दृष्टीने अनोख्या प्लांट ट्रकची निर्मिती केली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा बायोफिलियाच्या सह-संस्थापिका अनुराधा बारपांडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. यावेळी दुर्गा धर्माधिकारी व अजय बोकील उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना अनुराधा बारपांडे म्हणाल्या की, “प्लांट ट्रक सारख्या सेवा अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, भारतात त्या फारशा सुरु झालेल्या दिसत नाहीत. प्लांट ट्रकच्या माध्यमातून होम किंवा टेरेस गार्डनसाठी गरजेच्या सेवा घरपोच देण्याचा आमचा हा प्रयत्न कदाचित भारतातील पहिलाच असावा.”

गेले काही महिने बंगळूरू येथील नवीन विमानतळाच्या आतील हिरवाई ही जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच प्रसिद्ध अभिनेते व पुण्यातील एफटीआयआयचे नवनियुक्त संचालक आर. माधवन यांना देखील या हिरवाईची भुरळ पडून त्यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून त्याचे कौतुक केले होते. बंगळूरू विमानतळाच्या आतील भागात असलेली, सुमारे ५५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त भागात पसरलेली आणि बाहेरील बाजूने खऱ्या रोपांनी वेढलेल्या अवाढव्य आकाराच्या हँगिंग बेल्स व व्हेल्स यांच्या निर्मितीचे श्रेय हे पुण्याच्या अनुराधा बारपांडे व त्यांचे पती प्रदीप बारपांडे यांना जाते.

आमच्या या प्लांट ट्रकच्या माध्यमातून अनेकविध प्रकारची रोपे, सुंदर डिझाईनच्या कुंड्या, घरातील नैसर्गिक हिरवळीसाठीच्या अॅक्सेसरिज, आवश्यक खते, इनडोअर व टेरेसवर बागकाम करण्यासाठीच्या आवश्यक सेंद्रिय गोष्टी, इनोव्हेटिव्ह व्हर्टीकल ग्रीनरीचे विविध पर्याय व यासोबतच कुशल मनुष्यबळ तुमचे होम किंवा टेरेस गार्डन नेहमीच फुललेले व हिरवेगार रहावे यासाठी उपलब्ध असेल.

घरातील या लहानशा का होईना परंतु शाश्वत हिरवळीशी नागरिकांचे नाते तयार व्हावे, निसर्गाचा सहवास असल्याचा आनंद मिळावा व आजूबाजूचे वातावरण प्रसन्न रहावे यासाठी ‘प्लांट ट्रक’ हे आम्ही टाकलेले एक आश्वासक पाऊल आहे, असे बारपांडे यांनी नमूद केले.

याविषयी अधिक माहिती देताना दुर्गा धर्माधिकारी म्हणाल्या, “बायोफिलिया व आमच्या प्लांट ट्रकमध्ये उपलब्ध असलेली रोपे ही आमच्याच खेड शिवापूर येथील स्वतःच्या नर्सरीमध्ये विकसित केली जातात, त्यामुळे त्यांचा दर्जा व गुणवत्ता राखणे आम्हाला शक्य होते. बायोफिलियाच्या संस्थापकांच्या ३३ वर्षांच्या अनुभवातून रोपांच्या वाढीसाठी पोषक असे काही सेंद्रीय घटक एकत्र करून एक विशिष्ट प्रकारचा माती विरहित ग्रोथ मिडिया तयार करण्यात आला आहे. याचा फायदा रोपांची पीएच व्हॅल्यू नियंत्रित ठेवणे, जास्त काळ पाणी धरून ठेवणे, किडे, मुंग्या, डास यांना दूर ठेवणे यासाठी तर होतोच परंतु घरातील बागेत लावलेल्या रोपांची देखभाल प्रक्रिया सुलभ करण्यास देखील याची मदत होते. या प्लांट ट्रकच्या माध्यमातून याविषयी जनजागृती करण्याच्या आमचा मानस आहे. याअंतर्गत मोठमोठ्या गृहरचना संस्थांमध्ये हा ट्रक घेवून जात काही कार्यशाळांचे आयोजन देखील केले जाईल, असे धर्माधिकारी यांनी सांगितले.

बायोफिलियाच्या संस्थापकांची मूळ संस्था असेलेली इकोग्रीन लँडस्केप टेक्नॉलॉजीज् ही देशातील हरित भिंती अर्थात ग्रीन वॉल उभारणारी प्रमुख संस्था असून आवश्यकतेप्रमाणे ग्रीन वॉल, ग्रीन रुफ्स, अर्बन फार्मिंग यामध्ये संस्था कार्यरत आहे. १९८७ पासून ही संस्था कार्यरत असून तांत्रिक अंमलबजावणी, देखभाल मोठ्या वृक्षांचे प्रत्यारोपण, मातीची धूप नियंत्रित करणे, मोठ्या प्रमाणावर रोपांचा पुरवठा आणि लँडस्केप देखभाल आदी कामांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. संस्थेच्या संस्थापिका अनुराधा बारपांडे या सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील तज्ज्ञ असून प्रदीप बारपांडे यांना शाश्वत, नाविन्यपूर्ण हिरवाईच्या निर्मितीमध्ये विशेष रस आहे. संस्थेने विकसित केलेल्या ग्रीन वॉल संकल्पनेला पेटंट मिळाले आहे. याआधी ग्रीन वॉल परदेशातून आणल्या जात असत किंवा परदेशी तंत्रज्ञान वापरून त्या भारतात विकसित केल्या जात असत.

बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वांत मोठी मानवनिर्मित व्हर्टिकल गार्डन अर्थात ग्रीन वॉल तयार करण्याचे श्रेय या संस्थेला जातेच. परंतु केवळ बागनिर्मिती करून न थांबता यातील प्रत्येक झाडाची देखभाल करणे अत्यंत जिकीरीचे ठरणार असल्याचे आधीच ओळखून बारपांडे दाम्पत्याने यात सेन्सरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यातील झाडांना पाणी देण्याची, पाण्याचा निचरा होण्याची पद्धत विकसित केली आहे. तसेच झाडांची इतर देखभाल करणे सोपे व्हावे, यासाठी सुयोग्य अशी रचना करण्यात भर दिला गेला आहे.