October 14, 2024

पुणे आरपीएफ ने 286 मुलांची सुटका करुन त्यांना कुटुंबियांकड़े सोपविले

पुणे, २३/०२/२०२३: रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) रेल्वे मालमत्तेची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करते. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची, त्यांच्या सामानाची तसेच रेल्वे प्रवासी क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारीही आरपीएफकडे सोपवण्यात आली
आहे. आरपीएफ रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांविरुद्ध लढत राहते, महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी जागरुक राहते आणि रेल्वे परिसरात आढळलेल्या निराधार मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य ती कारवाई करते.

मध्य रेल्वेच्या आरपीएफ पुणे विभागाने भारतीय रेल्वेवर सुरू केलेल्या “ऑपरेशन नन्हे फ़रिश्ते” या विशेष मोहिमेअंतर्गत विविध कारणांमुळे हरवलेल्या/ त्यांच्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या मुलांना शोधून त्यांची सुटका करण्याचे उदात्त कार्य हाती घेतले आहे. यासाठी विशेष टीम “सावित्रीबाई फुले” ऑपरेशन नन्हे फ़रिश्ते राबविण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत RPF पुणे विभागाने 286 मुलांची रेल्वे परिसरातून आणि गाड्यांतून सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी, या सुटका केलेल्या मुलांची माहिती आणि तपशील ट्रॅक चाइल्ड पोर्टल – 3.0 वर अपलोड केली जात आहे आणि त्याची लिंक भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर (https://indianrailways.gov.in) वर उपलब्ध आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स चोवीस तास काम करत आहे.