मुंबई , २७ जून २०२५: श्री क्षेत्र भीमाशंकरच्या 288.17 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली असून, या आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण क्षेत्राचा दर्जेदार आणि सुनियोजित विकास पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक भेट देतात. त्यामुळे या क्षेत्रात दर्जेदार सुविधा विकसित करणे आवश्यक असून, इको टुरिझमसह वनभ्रमण पथ, रोपवे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, निवास व्यवस्था यांचे नियोजन तातडीने केले जावे. विकास आराखड्याची अंमलबजावणी निश्चित वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून कामाला गती देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भीमाशंकर परिसरात हेलीपॅड सुविधा, अखंडित वीज पुरवठ्यासाठी उपकेंद्र, स्थानिक व्यावसायिकांसाठी नव्या दुकानांची निर्मिती आणि राजगुरुनगर-तळेघाट-भीमाशंकर महामार्गाचा विकास करण्यावरही भर देण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलिस चौकी उभारण्याचेही नियोजन असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आराखड्याची अंमलबजावणी गतीने करण्याचे आश्वासन दिले.
More Stories
पुणे: हिंजवडीसह सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश; उपमुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मागवला
तब्बल २० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; महाराष्ट्रातील शाळांवर हिंदी लादण्यास विरोध
पुणे महापालिकेत समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार: मंत्री उदय सामंत