February 12, 2025

पुणे: सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या क्रीडा महोत्सवात रंगली स्केटींग व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा

खराडी, १४/०१/२०२५: सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने ३ नोव्हेंबर ते २ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणाऱ्या क्रीडा महोत्सवातील स्केटींग व टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धा शनिवारी व रविवारी (ता. ११ व १२) संपन्न झाली. विमाननगर येथील स्केटींग ट्रॅक येथे स्केटीग चॅम्पियनशीप, तर खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम येथे टेबल टेनिस चॅम्पियनशीप आयोजित करण्यात आली होती. खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, धानोरी, येरवडा, लोहगाव येथील विविध भागांमधून स्केटींग चॅम्पियनशीप स्पर्धेत ४१९ तर व टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत ३६७ स्पर्धक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी प्रेक्षक नागरिकांमध्ये पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.

“दरवर्षी एसपीएफ क्रीडा स्पर्धेचे आयोजन करताना मोठा आनंद होतो. न्यू पुण्यातील विविध भागांतील विविध सोसायटींतील नागरिक एकत्र येऊन या क्रीडा महोत्सवात सहभागी होत असतात. स्केटींग स्पर्धेतील चिमुकल्यांचे कौशल्य पाहून थक्क व्हायला झाले. अत्यंत चपळाईने व चतुरतेने हा खेळ ते खेळत होते. क्रीडा संस्कृती रुजवण्यासोबतच नागरिकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचे काम या क्रीडा महोत्सवातून होत आहे”, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.

टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बापूसाहेब पठारे यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, “सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे आपल्या भागात क्रीडा संस्कृती रुजावी व प्रत्येक क्रीडा प्रकाराला चालना मिळावी तसेच क्रीडापटूला व्यासपीठ मिळावे म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.”

एसपीएफ क्रीडा स्पर्धेंतर्गत स्केटींग व टेबल टेनिस या व्यतिरिक्त स्विमिंग, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बॉक्स फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट या मैदानी क्रीडा प्रकारांबरोबरच बुद्धिबळ, कॅरम या बैठ्या क्रीडा प्रकारांच्या समावेश करण्यात आला असून, नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने केले आहे.