पुणे, ०४/०५/२०२३: ऑनलाइन मोबाइल संच खरेदी व्यवहारात मागवण्यात आलेले मोबाइल संचांऐवजी खोक्यात साबणाच्या वड्या भरुन फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील चोरट्यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली.
अभिषेक हरिभाऊ कंचार (वय २०, रा. श्रीगणेश छाया बिल्डींग, दिवा, ठाणे), धीरज दीपक जावळे (वय २१, रा. सिजन सहारा रिजन्सी, नांदिवली, कल्याण, जि. ठाणे), आदर्श उर्फ सनी शिवगोंविद चौबे (वय २५, रा. कस्तुरी चाळ, मानपाडा, डोंबिवली, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावेे आहेत.
कोंढवा भागातील झॅप एंटरप्रायजेस कंपनीकडून ऑनलाइन पद्धतीने खरेदी केलेल्या मोबाइल संच ग्राहकांना घरपोहोच देण्यात येतात. आरोपी कंचार, जावळे, चौबे यांनी ऑनलाइन मोबाइल संच मागविले होते. डिलिव्हरी बाॅय मोबाइल संच घेऊन आरोपींकडे गेल्यानंतर आरोपी मोबाइल संचात त्रुटी असल्याचे भासवून परत करायचे. डिलिव्हरी बाॅयला बोलण्यात गुंतवून आरोपींनी मोबाइलच्या खोक्यात मोबाइल संच न ठेवता त्यात साबणाच्या वड्या भरल्या होत्या. सेनापती बापट रस्ता परिसरात अशा प्रकारचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा खंडणी विरोधी पथकाकडून तपास करण्यात येत होता.
आरोपी कंचार, जावळे, चौबे यांनी डिलिव्हरी बाॅयची फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने तपास करुन तिघांना पकडले. सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विकास जाधव, मधुकर तुपसौंदर, प्रवीण ढगाळ, सयाजी चव्हाण, रवींद्र फुलपगारे, हेमा ढेबे, नितीन कांबळे आदींनी ही कारवाई केली.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान