July 24, 2024

पुणे: वादळी पावसाचा वीजयंत्रणेला पुन्हा तडाखा

पुणे, दि. १३ एप्रिल २०२३: आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे रामबाग कॉलनी, वेदविहार, गोखलेनगर, पाषाण, धानोरी, चऱ्होली, संतनगर, भवानीपेठ, माळवडी, म्हाळुंगे या परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचारी युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. आज रात्री १०.३० वाजेपर्यंत सर्व ठिकाणी वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होईल अशी स्थिती आहे.

आज सायंकाळी पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या काही भागात जोरदार वादळ व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्या. तसेच काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे आर्द्रता निर्माण होऊन भूमिगत वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला.

पुणे शहरातील कोथरूडमधील रामबाग कॉलनीमध्ये वीजवाहिनीवर झाड पडल्यामुळे २० वितरण रोहित्रांवरील ४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. कोसळलेले झाड तोडून ते हटविण्यात येत असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणकडून तातडीने सुरु करण्यात आले आहे. तसेच वेदविहार परिसरातील चार वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा पावसामुळे वीजवाहिनीत बिघाड झाल्याने बंद पडला. भवानीपेठ येथे उपरी वाहिनीवर झाड पडल्याने चार वितरण रोहित्रांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. झाडे कोसळल्याने गोखलेनगरमधील जनता वसाहत, जनवाडी भागात तसेच पाषाण भागात वीजपुरवठा खंडित झाला. तर सुस रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तातडीने दुरुस्ती कामे करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

यासोबतच पिंपरी व भोसरी परिसरातील वादळी व मुसळधार पावसामुळे आकुर्डीमधील डी ३ ब्लॉक, चऱ्होली, म्हाळुंगे, माळवडी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झालेल्या भागात वीजयंत्रणेची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरु असून काही ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून आज रात्री ९ ते १०.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी स्थिती आहे.

नगररोडमधील धानोरी परिसरातील मयूर किलबिल या सोसायटीच्या दोन वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा काल सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वीजवाहिनीतील बिघाडामुळे बंद पडला होता. त्यानंतर दुसऱ्या वीजवाहिनीद्वारे सोसायटीमधील दोन्ही रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र त्या वीजवाहिनीत देखील बिघाड झाल्यामुळे रात्री ९ च्या सुमारास या सोसायटीमधील वीजपुरवठा खंडित झाला. आज सकाळी ७ वाजता नादुरुस्त झालेल्या दोन्ही वीजवाहिन्यांमधील बिघाडांचा शोध सुरु झाला त्यात एकूण पाच ठिकाणी बिघाड झाल्याचे आढळून आले. त्यानंतर जेसीबीने खोदकाम करून वाहिन्यांना जाईंट देऊन दुरुस्ती करण्यास सायंकाळपर्यंत अवधी लागला. परंतु पुन्हा जोरदार पावसाने हजेरी दिल्याने दुरुस्ती कामात अडथळा आला. मात्र दोनपैकी एक वीजवाहिनीची दुरुस्ती पूर्ण करून मयूर किलबिल सोसायटीमधील वीजपुरवठा आज रात्री साडेआठच्या सुमारास सुरळीत करण्यात आला.