May 19, 2024

पुणे: विद्यार्थी हिताचा निर्णय घेत विद्यापीठाकडून ‘एसओपी’ला स्थगिती 

पुणे, ०८/०१/२०२४ – विद्यार्थी संघटनांची आंदोलने, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने नवीन कार्यप्रणाली (एसओपी) विकसित करण्यात येणार होती. मात्र सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावित ‘एसओपी’ला स्थगिती देण्यात आली आहे. एसओपी निर्माण करण्यापेक्षा समन्वयाने, चर्चेने प्रश्न सोडविण्यावर यावेळी भर देण्यात आला.

 

विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे, विद्यापीठ सुरक्षा विभागाचे संचालक श्री. सुरेश भोसले यांच्यासह विविध संघटनांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते.

 

 

विद्यापीठात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने विद्यार्थी, कर्मचारी संघटनांच्या कार्यक्रम, उपक्रम, आंदोलनांसाठी कार्यपद्धती निश्चित करण्याचे ठरवले होते. मात्र सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे होणाऱ्या परिणामावर चर्चा करण्यात आली. विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी या एसओएपी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थी संघटनांना उपक्रम, कार्यक्रमांसाठी किमान पाच दिवस आधी पूर्वपरवानगी, निश्चित केलेल्या जागेतच कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्याचे बंधन घालण्यात आले असून, विद्यापीठाचे नुकसान न होण्याबाबतचे लेखी हमीपत्रही द्यावे लागणार असे मुद्दे प्रस्तावित एसओएपीमध्ये मांडण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी असे नियम असू नयेत,अशी स्पष्ट भूमिका मांडली.

 

त्यावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी विद्यार्थी हिताचा विचार करत एसओपीला सध्या स्थगिती दिली जात असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठातील वातावरण शांततामय राहण्यासाठी सहयोग करणार असल्याची हमी दिली.