October 13, 2024

पुणे: पोटनिवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त, पोलिसांकडून सोशल मीडियावरही ठेवले जाणार लक्ष

पुणे, दि. ०१/०३/२०२३: कसबा  पोटनिवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाचे गोदामासह मध्यभागात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा  ७०० हून जादा मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय विविध पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१ मार्च) पोलीस आयुक्तालायात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.

पोलिसांकडून कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्न धान्य महामंडळाचे गोदाम तसेच मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियाननगर, कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवला आहे. कोरेगाव पार्कमधील गोदामात मतमोजणी होणार असून तेथील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. दरम्यान, संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.

मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच पैसे वाटपाचे आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.  गुरुवारी (२ मार्च) दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान,  निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून सोशल मीडियावरही  पोलिसांची नजर राहणार आहे. सायबर गुन्हे शाखेचे पथक समाजमाध्यमातील संदेशांवर लक्ष ठेवणार आहे. गैरप्रकार तसेच आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला नाही.  कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

परिक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होउ नये, दक्षता घ्यावी
दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना त्वरीत पोहोचता यावे, यासाठी संबंधित वाहतूक विभागाने खबरदारी घ्यावी. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.