October 3, 2024

पुणे: ज्वेलर्स दुकानावरील सशस्त्र दरोडा प्रकरणी दोघे अटकेत

पुणे, ०१/०४/२०२३: बारामती तालुक्यातील सुपे येथे शुक्रवारी एका ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोडेखोर यांनी भरदिवसा दरोडा टाकला होता. यावेळी दुकानातील मालकीण असलेल्या महिलेने प्रसंगावधान दाखवत सायरन वाजवल्याने आणि आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले.चोरट्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थ येत असल्याचे पाहून चोरट्यांनी गोळीबार केल्याने तीनजण जखमी झाले होते.

याप्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.
पवन विश्वकर्मा ( रा. उत्तरप्रदेश), प्रदीप बिसेन ( गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे. याबाबत अश्विनी सुयेश जाधव या ज्वेलर्स मालकीणने आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

या घटनेत अशोक बागुजी बोरकर, सागर दत्तात्रय चांदगुडे, सुशांत क्षीरसागर असे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती परिसरात सुपे याठिकाणी बाजार मैदान लगत महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अनोळखी व्यक्ती हातात बंदूक घेऊन दुकानात शिरले. त्यांनी दुकानातील कामगार सुशांत क्षीरसागर आणि  मालकीण अश्विनी जाधव यांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर दुकानातील सोन्याच्या अंगठ्या , मंगळसूत्र ,सोनसाखळी अशा सर्व गोष्टी काळ्या रंगाच्या बॅगेत भरण्यास सुरुवात केली. यादरम्यान, प्रसंगावधान दाखवत अश्विनी जाधव यांनी चोरट्यांचे लक्ष विचलित करून तीन पिस्टल अंगावर रोखलेल्या असतानाही, सायरनचा बटन दाबले. त्यामुळे सायरनच्या आवाजाने चोरट्यांचा गोंधळ उडाला. याचदरम्यान जाधव यांनी आरडा ओरड सुरू केल्याने, चोरट्यांनी दुकानाचे शटर उघडुन बाहेर पाडण्यास सुरुवात केली. यादरम्यान, ग्रामस्थ मदतीसाठी येत असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. या घटनेत तीन जण जखमी झाले नागरिकांनी एका चोरट्यास पाठलाग करून पकडले.मात्र, इतर चोरटे कारमधून पसर झाले. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असताना, आणखी एकास अटक केली आहे. त्यांचे इतर प्रसार झालेल्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.