May 7, 2024

पुणे: रोझरी स्कूलचे विनय आरहाना यांना ’ईडी’कडून अटक, काॅसमाॅस बँकेची २० कोटी रुपयांची फसवणूक

पुणे, ११/०३/२०२३: रोझरी स्कूलचे संचालक विनय आरहाना यांना सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. आरहाना यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने २० मार्चपर्यंत ’ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रोझरी स्कूलचे संचालक विनय आरहाना यांच्या विरुद्ध काॅसमाॅस बँकेची २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरहाना यांनी बँकेकडून कर्ज घेतले हाेते. कर्जाची परतफेड करण्यात न आल्याने बँकेकडून फसवणुकीची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर आरहाना यांनी व्यवसायात बेकायदा काळा पैसा गुंतविल्याचा संशय ‘ईडी’ला होता. त्यामुळे ‘ईडी’कडून या प्रकरणात समांतर तपास सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पिंपरीतील सेवा विकास बँकेचे संचालक अमर मुलचंदानी आणि रोझरी स्कूलचे विनय आरहाना यांच्या मालमत्तेवर ‘ईडी’च्या पथकाने २८ जानेवारी रोजी छापे टाकले होते.

त्यानंतर ‘ईडी’च्या मुंबई कार्यालयातील पथकाने आरहाना यांना शुक्रवारी (१० मार्च) अटक केली. आरहाना यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी आरहाना यांना २० मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रोझरी स्कूलचे संचालक विनय आरहाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी काॅसमाॅस बँकेकडून २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. शाळेच्या नूतनीकरणासाठी कर्जाची रक्कम वापरणे अपेक्षित असताना आरहाना यांनी या रकमेचा अपहार केला. नूतनीकरणासाठी बनावट निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आरहाना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘ईडी’कडून समांतर तपास करण्यात आला होता. ‘ईडी’ने २८ जानेवारी रोजी आरहाना यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी करण्यात आली हाेती.