October 13, 2024

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीगच्या सहा संघांसाठी विक्रमी किंमत

पुणे 2 जून 2023- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रिमियर लीगमध्ये (एमपीएल) खेळणाऱ्या सहा संघांसाठी तब्बल 57 कोटीहून अधिक रुपयांचे फ्रॅंचाईजी शुल्क मिळाले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) चे अध्यक्ष रोहित पवार यांनी ही माहिती दिली. लीगच्या फ्रॅंचाईजी मिळविण्यासाठी आज लिलाव प्रक्रिया पार पडली. या सहा संघांसाठी 20 उद्योजक आणि व्यावसायिक संस्थांनी सहभाग घेतला.
एमपीएलसाठी सहा संघांची निर्मिती करताना तीन वर्षांसाठी प्रत्येकी एक कोटी या प्रमाणे 18 कोटी रुपयांचे शुल्क महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला अपेक्षित होते. मात्र, या संघ लिलाव प्रक्रियेला व्यावसायिक आणि उद्योजक क्षेत्राकडून जबरदस्त पाठिंबा मिळाला असून, तीन वर्षांसाठी आम्हाला 57.80 कोटी रुपयांचा महसूल निर्माण झाल्याचे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) चे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.
खुल्या पद्धतीने या संघांसाठी बोली लावण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने पार पडल्याची माहितीही पवार यांनी या वेळी दिली.
लिलावात यजमान पुणे फ्रॅंचाईजीची मालकी प्रविण मसालेवाले कंपनीने 14.8 कोटी रुपयांना मिळवली. त्यांनी ऋतुराज गायकवाडला आपला प्रमुख खेळाडू म्हणून निवडले. दुसरी सर्वाधिक 11 कोटीची बोली कोल्हापूर संघासाठी लागली. या संघाची मालकी पुण्यातील उद्योजक पुनित बालन समूहाने मिळवली. या फ्रॅंचाईजीने केदार जाधवला आपला प्रमुख खेळाडू केले आहे.
अन्य संघात ईगल इन्फ्रा इंडिया कंपनीने नाशिक संघासाठी 9.18 कोटी रुपयाची बोली लावताना राहुल त्रिपाठीला प्रमुख खेळाडू म्हणून पसंती दिली. संभाजीनगर संघाची मालकी वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसने 8.70 कोटी रुपयांना मिळविली. राजवर्धन हंगरेकर त्यांचा प्रमुख खेळाडू असेल. जेट सिंथेसिसने रत्नागिरी संघाची मालकी 8.30 कोटी रुपयांना मिळविली. अझिम काझी त्यांचा प्रमुख खेळाडू राहिल. विकी ओस्तवालला प्रमुख खेळाडू म्हणून निवडताना कपिल सन्स एक्सप्लोसिव्ह एलएलपीने सोलापूर संघाची मालकी 7 कोटी रुपयांना मिळविली.
ही लीग स्पर्धा सर्व संघ मालकांसाठी फायदेशीर ठरण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लिलावातून जमा होणारा पैसा महाराष्ट्रातील क्रिकेटच्या भल्यासाठी वापरला जाईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
एमसीए महाराष्ट्रातील क्रिकेटच्या वाढीसाठी नेहमीच कटिबद्ध राहिल. तरुण आणि उदयोन्मुख गुणवत्तेला या लीगच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी एमपीएलच्या नियोजनासाठी स्वतंत्र कार्यकारी समितीचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये एमसीएच्या सर्वोच्च परिषदेचे सदस्य सचिन मुळ्ये एमपीएलचे अध्यक्ष असतील. अन्य सदस्यांमध्ये एमसीएचे सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज आणि कायदेशीर सल्लागार कमलेश पिसाळ यांचा समावेश असेल.
एमसीए च्या कार्यकक्षेत 21 जिल्ह्यांतील 200 हून अधिक खेळाडू सहा संघांसाठी लिलावात उपलब्ध असणार आहेत.