May 18, 2024

जेजुरी येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात ५ हजारावर रिक्त पदांच्या भरतीची संधी

पुणे, दि. ११: शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी येथे १३ जुलै रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात ५ हजार २९० रिक्तपदांसाठी भरतीची संधी उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले आहे.

जेजुरी येथे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात इयत्ता पाचवी, दहावी, बारावी, पदविकाधारक, पदवीधारक, आयटीआय, बीई-बीटेक आदी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यामध्ये टूल अँड डाय मेकर, फिटर, वेल्डर, हेल्पर, सीएनसी ऑपरेटर, वीजतंत्री, असेंबली लाईन ऑपरेटर, विक्री अधिकारी, लेखापाल, बँकेमध्ये पर्यवेक्षक, विक्री समन्वयक, प्रक्षिणार्थी, रासायनिक पदविकाधारक, हाऊस किपींग, निर्माता क्षेत्रातील पुरवठादार, गुणवत्ताधारक, मशीन ऑपरेटर, रंगारी, टर्नर, मॅकनिकल संचालक, वाहनचालक, वैज्ञानिक, शैक्षणिक सल्लागार, व्यवसाय विकास व्यवस्थापक, ग्राहक प्रतिनिधी, बॉयलर ऑपरेटर, डिझायन अभियंता, पेट्रोल-डिझेल फिलींग, मिलर, ग्रांडर, बीई इलेक्ट्रीकल, मॅकेनिकल आदी रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने नोंदवावे. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इच्छूक उमेदवारांनी या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या बायोडाटा सह आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. इच्छुकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.