May 20, 2024

मतदार चिठ्ठी वितरणाचा समन्वय अधिकारी नीलिमा धायगुडे यांच्याकडून आढावा

पुणे, 08 मे 2024: जिल्ह्यातील पुणे, शिरुर व मावळ लोकसभेसाठी सोमवार १३ मे रोजी मतदान होणार असून तीनही मतदार संघातील मतदार चिठ्ठ्या वितरणाचा अपर जिल्हाधिकारी तथा मतपत्रिका वितरण समन्वय अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी आढावा घेतला.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वय अधिकारी अर्चना तांबे, सहायक मतपत्रिका वितरण समन्वय अधिकारी वर्षा पवार, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, तीनही लोकसभा मतदार संघातील सहकारी संस्थांचे उपनिबंधक उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघात ७७ टक्के, पुणे ६१ टक्के व शिरुर लोसभा मतदार संघात ६४ टक्के मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आल्याचे सांगून श्रीमती धायगुडे म्हणाल्या, शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सोसायट्यांमधील मतदारांना जास्तीत जास्त मतदानासाठी प्रेरित करण्यावर प्रशासनाने भर दिला असून जिल्हा उपनिबंधक, लेखापरीक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी समन्वय ठेऊन प्रत्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करावे व तेथील नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. मतदार चिठ्ठी म्हणजे ओळखपत्र नाही, मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र किंवा ते नसल्यास भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेल्या अन्य १२ पुराव्यांपैकी एक ओळखपत्र आवश्यक असल्याचे श्रीमती धायगुडे यांनी सांगितले.