September 10, 2024

अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत सहा संघ सहभागी

पुणे, 29 मार्च 2023: सहाव्या अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत राज्यातील अव्वल 6 क्लबमधील 80हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा रवाईन हॉटेल, पाचगणी येथे 30 मार्च ते 1 एप्रिल 2023 या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेतील सहा संघांमध्ये मुंबईतील खार जिमखाना,मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए), पुण्यातील पीवायसी अ, पीवायसी ब संघ, अमरावती संघ आणि कम्बाईन जिल्हा संघांचा समावेश आहे. हि स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असून याआधी राज्यभरात विविध ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत 1500 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेत एकूण 7,50,000रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून सर्व संघांना हॉस्पिटॅलिटी व प्रवासाचा खर्च देखील देण्यात येणार आहे. 35वर्षावरील गटात अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. वर्षानुवर्षे या स्पर्धेस खेळाडूंचा मिळणारा प्रतिसाद पाहून आम्हांला आनंद होत आहे, असे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले. याआधीची मालिका पुण्यात दोन वेळा, मुंबई, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी पार पडली होती.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 1,25,000 रुपये, तर उपविजेत्या संघाला 75,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 25,000 रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार हे स्पर्धा संचालक असणार आहे.

स्पर्धेतील सहभागी संघ व गट पुढीलप्रमाणे:

अ गट: पीवायसी अ, कम्बाईन डिस्ट्रिक, खार जिमखाना;

ब गट: मुंबई क्रिकेट असोसिएशन, पीवायसी ब आणि अमरावती जिल्हा संघ.