December 14, 2024

‘तरुणींवरील हल्ल्यांना जरब बसवा’ – भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट

पुणे, २८/०६/२०२३: पुणे शहरात सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या कोयत्या हल्ल्याच्या आणि इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा करण्याची मागणी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. शिवाय पुणे पोलीस आयुक्त हद्दीत प्रस्तावित नव्या सात पोलीस स्टेशनच्या निर्मितीबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णयही या भेटीदरम्यान झाला.

भाजपाच्या शिष्टमंडळात प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, धीरज घाटे, अजय खेडेकर, दीपक नागपुरे, अमोल कविटकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, संदीप लोकर, बापू मानकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

“पोलिसांनी आरोपींवर वचक ठेऊन कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी कार्यपद्धती ठेऊन कार्यरत राहणे आवश्यक आहे. शिवाय गस्तीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणे ही गरज असून त्यासाठी गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे.”- मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा

गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसावा यासाठी कडक कलमे लावून जास्तीत जास्त शिक्षा आरोपींना होईल, या दृष्टीने पोलीसांनी खटला न्यायालयीन पातळीवर मांडावा या मागणीसह कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संकुलात तक्रार पेटी बसविणे, दुचाकीवरील मार्शलची संख्या वाढवून गस्त वाढविणे, गरज पडल्यास गणेश मंडळ कार्यकर्त्यांना सामावून घेणे, बंद असलेल्या पोलीस चौकी पुन्हा सुरु करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.