October 14, 2024

३० जून ते २ जुलै दरम्यान रंगणार ‘स्वरमल्हार’ महोत्सव

पुणे, दि. २० जून, २०२३ : ओर्लीकॉन बाल्झर्स आणि व्हायोलिन अकादमी यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘स्वरमल्हार महोत्सव’ यावर्षी शुक्रवार दि ३० जून ते रविवार दि २ जुलै, २०२३  दरम्यान सायंकाळी ५ वाजल्यापासून स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न होणार आहे. महोत्सवाचे हे आठवे वर्ष असून यावर्षी बढेकर गृप, विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लि., विलो यांचे विशेष सहकार्य महोत्सवाला लाभले आहे. व्हायोलिन अकादमीचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी सदर माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये आणि महोत्सवाचे आयोजक व व्हायोलिन वादक राजस उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते.

महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना पं अतुलकुमार उपाध्ये म्हणाले की, “लवकरच सुरु होणारा वर्षा ऋतू आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात पुणेकर रसिकांना आम्ही तानसेनापासून ते अगदी आजच्या फ्युजनपर्यंत शास्त्रीय, उपशास्त्रीय, गायन, वादन, नृत्य यांची सांगीतिक अनुभूती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच उदेशाने आम्ही दरवर्षी या महोत्सावाचे आयोजन करीत असतो.”

आठव्या स्वरमल्हार महोत्वाची सुरुवात ३० जून रोजी सायं ५ वाजता होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायिका विदुषी देवकी पंडित, सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी आणि बासरीवादक अश्विन श्रीनिवासन हे एकत्रितपणे ‘मल्हार धून – शेडस् ऑफ रेन स्टोरी ऑफ ताना- रिरी विथ राग संगीत अँड पोएट्री’ हा अनोखा कार्यक्रम सादर करतील. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अभिनय रवांदे (संवादिनी), ओंकार दळवी (पखवाज), सुस्मिरता डवालकर (गायन) हे साथसंगत करतील. डॉ समीरा गुजर- जोशी या सदर कार्यक्रमाचे निवेदन करतील.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (१ जुलै, सायं ५ वाजता) प्रसिद्ध नृत्यांगना निधी प्रभू या कथक नृत्य प्रस्तुत करतील. निधी प्रभू या डॉ मंजिरी देव आणि पं मुकुंदराज देव यांच्या शिष्या आहेत. त्यांना गुरु पं मुकुंदराज देव (तबला व पढंत), श्रीरंग टेंबे (संवादिनी व गायन) आणि जुबेर शेख (सतार) हे साथसंगत करतील. यानंतर ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन होईल. त्यांना पं कुमार बोस (तबला) आणि तेजस व राजस उपाध्ये हे व्हायोलिनवर साथसंगत करतील. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं अजय पोहनकर (गायन) आणि अभिजित पोहनकर (किबोर्ड) यांच्या एकत्रित सादरीकरणाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.

पं वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या शास्रीय गायनाने स्वरमल्हार महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाला (२ जुलै, सायं ५ वाजता) सुरुवात होईल. यानंतर पं कुमार बोस यांचे एकल तबलावादन होणार आहे. पं कुमार बोस हे बनारस घराण्याचे जागतिक कीर्तीचे तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत. इमादादखानी घराण्याच्या सातव्या पिढीचे सुप्रसिद्ध सतारवादक पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज आणि सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या सादरीकरणाने तिसऱ्या दिवसाचा व महोत्सवाचा समारोप होईल.

स्वरमल्हार महोत्सव सशुल्क असून classicalevents.in या संकेतस्थळावर आणि बुक माय शो येथे महोत्सवाची तिकिटे उपलब्ध असतील अशी माहितीही यावेळी राजस उपाध्ये यांनी दिली.