May 18, 2024

मध्यमवर्गाने राजकारणाकडे लक्ष द्यायला हवयं; राज ठाकरे यांचे प्रतिपादन

पुणे, २१ ऑक्टोबर, २०२३ : मध्यमवर्गीय नागरिक राजकारणाला केवळ शिव्या घालतात. राजकारण आणि राजकारणी यांपासून आपण दूरच बरे, असा अविर्भाव आणतात. मात्र, उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचं सगळं आयुष्य हे राजकारणाशी बांधल गेलं आहे, हे तुमच्या लक्षात येत नाही. बदल घडवायचा असेल तर मध्यमवर्गीय नागरिकांनी अगदी निवडणूक लढवण्याची गरज नसली तरी त्यांनी राजकारणाकडे लक्ष द्यायला हवयं, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, पुणे सेंटरच्या वतीने जागतिक शिक्षक दिन आणि जागतिक वास्तुविशारद दिनाचे औचित्य साधत सातारा रस्ता, बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते ५० वर्षांपेक्षा जास्त काळ आर्किटेक्चर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विकास भंडारी, विश्वास कुलकर्णी आणि शोभा भोपटकर या तिघा जेष्ठ वास्तुविशारदांचा आयआयए एस. के. बेलवलकर अवार्ड फॉर एक्सलन्स इन प्रोफेशन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट, सहसचिव संदीप बावडेकर, इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या पुणे सेंटरचे अध्यक्ष विकास अचलकर, उपाध्यक्ष सीतेश अग्रवाल आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याबरोबरच पुणे विभागातील २२ आर्किटेक्चर महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षकांना आयआयए एस. जे. कॉन्ट्रॅक्टस् अवार्ड फॉर एक्सलंस इन टीचिंग पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. यानंतर निवेदक, लेखक दीपक करंजीकर, विकास अचलकर आणि सीतेश अग्रवाल यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मध्यमवर्ग हा गरीब आणि श्रीमंत यांमधील दुवा होता. १९९५ नंतर देशाच्या आर्थिक धोरणांत जे काही बदल झाले त्यामुळे काय होऊ शकेल याचा अंदाज मध्यम वर्गीयांना आला. इंटरनेट सुविधा आणि इतर बाबी यांमुळे सर्वांच्याच आयुष्याला वेग आला याच दरम्यान हम लोगो की ठोकर मै ही जमाना… अशा विचारांचा समाज निर्माण झाला आणि मध्यमवर्गाची पकड ढीली झाली. मात्र आता मध्यमवर्गीयांनी राजकारणात लक्ष द्यायला हवयं.”

वास्तुविशारदांना असलेली सौंदर्यदृष्टी उपयोगात आणून शहरीकारणाशी संबंधित काम करण्याची आज गरज आहे. आपण करत असलेल्या गोष्टी कोणासाठी करतो त्याबद्दल आपल्याला आस्था असायला हवी. ती आस्था मला आहे, त्यामुळे भविष्यात कधीही वास्तुविशारदांनी त्यांच्या संकल्पना घेऊन मला भेटावे मी जे करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न करेल, असेही ठाकरे म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले की, “सौंदर्यदृष्टी ही सत्तेत असायला हवी. शहरीकरण, शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काय व्हायला हवे, त्यासाठी कशा पद्धतीच्या कामाची गरज आहे, ते कोणाला सांगायला हवे हेच आज कळत नाही. त्यामुळे सत्तेत असलेल्या राजाला सौंदर्यदृष्टी असेल तर आपोआप ती कार्यपद्धतीमध्ये झिरपत जाते.” आपल्याकडे शहर नियोजनाच्या आराखड्यापेक्षा शहराचे विकास आराखडे महत्त्वाचे मानले जातात. वास्तुविशारदांपेक्षा शहर अभियंत्याला जास्त महत्त्व दिले जाते ही सद्यपरिस्थिती आहे. केवळ रस्ते बांधून चालणार नाही तर त्यावरून जाताना कोणत्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, हेही कृतीत उतरायला हवे.”

ज्या महाराष्ट्रात संत गाडगेबाबांचा जन्म झाला त्या महाराष्ट्रात स्वच्छतेचे महत्त्व सांगायची वेळ येते हे आपले दुर्भाग्य आहे, असे सांगत राज ठाकरे पुढे म्हणाले, “मुंबई बरबाद व्हायला काळ जावा लागला मात्र पुण्याची ती अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. आज या शहरात पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीचे पुणे वेगळे, खराडीचे, नदीकाठचे पुणे वेगळे अशी परिस्थिती आहे. पुण्याकडे कोणत्याही राजकारण्याचे लक्ष नाही. दळणवळणाची साधने आल्यानंतर शहर नियोजन बदलावे लागते हा विचारही होत नाहीये. रोज आपले पाकीट घेऊन जगणारी ही लोकं आहेत.”

माझ्या हातात जर राज्याची सत्ता आली तर मी सर्व वास्तुविशारदांकडून शहरांचे नियोजन करून घेईल. शहरांची आखणी योग्य पद्धतीने झाली तरच, सुंदर शहरे वसणार आहेत. शहर नियोजन हे काही रॉकेट सायन्स नाही अशी कोपरखळीही ठाकरे यांनी मारली.

पुणे शहरात आज एफएसआयचा सुळसुळाट झाला आहे. बिल्डर लोक महानगरपालिकेला पैसे देऊन एफएसआय वाढवून घेत आहेत अशी परिस्थिती आहे. लोकसंख्येनुसार पुण्यात १५% रस्ते असायला हवेत हा आकडा आज ७-८% इतकाच आहे. एके दिवशी पुणेकर घरातून निघेल आणि तिथेच अडकून बसेल अशी मिश्कील टिप्पणी देखील ठाकरे यांनी केली. या आधी स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट हे महापालिका देत असे आज या गोष्टी मी उपलब्ध करून देतोय असे बिल्डर्स सांगतायेत. याचा अर्थ महानगरपालिका ही केवळ परवानगीपुरती राहिली आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

राजकारण्यांना धडा शिकवायचा असेल तर त्यांना मतपेटीमधून उत्तर दिल्या गेले पाहिजे तेव्हाच त्यांना त्यांची चूक उमगेल. मात्र, आश्चर्य म्हणजे असे काहीच होत नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

वास्तुविशारद हा सर्वसमावेशक आणि सुधारणावादी असतो, त्यामुळे पर्यावरणाला हातभार लावून शहर सुधारणा कशा करता येतील याचा विचार ते नक्की करतील असा आशावाद विलास अवचट यांनी व्यक्त केला. पुणे विभागातील २२ आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणत होत असलेला आजचा कार्यक्रम हा आयआयए पुण्याच्या इतिहासातील एकमेव कार्यक्रम असून आमच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप प्रयत्न केले आहेत याकडे विकास अचलकर यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमानंतर भाडिपाचे संस्थापक आणि स्टॅण्ड अप कॉमेडीयन सारंग साठ्ये यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर झाला.