September 17, 2024

द पूना क्लब स्विमिंग लीग 2023 स्पर्धेत आठ संघ सहभागी स्पर्धेस 26 मेपासून प्रारंभ

पुणे, 24 मे 2023 : पूना क्लब यांच्या वतीने आयोजित पहिल्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2023 स्पर्धेत आठ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पूना क्लब स्विमिंग पूल या ठिकाणी 26 ते 28 मे 2023 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा यांनी सांगितले की, पूना क्लबचे सदस्य असलेल्या विविध संघमालकांनी लिलाव प्रक्रियेतून निवड केलेल्या खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. याप्रसंगी व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव कर्नल सरकार, पीसीएसएल 2023 समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी वेंकीज, व्हेनकॉब व एनईसीसी हे मुख्य प्रायोजक असून रूबी हॉल क्लिनिक व सुराणा ट्रेडर्स हे सहप्रायोजक आहेत. अमाया शेट्टी (9वर्षे), विहान तुळपुळे (11 वर्षे), आदित्य महाराज सिंग (51वर्षे), आहान भिसे (17वर्षे), रौनक माळी (13वर्षे) आणि अनैशा सूद (13 वर्षे) हे लिलावातील सर्वात महागडे खेळाडू ठरले. स्पर्धेतील संघ व संघमालक असे आहेत – एएसआर डॉल्फिन्स (अमित रोपलेकर), जेट्स (राकेशनवानी), मॅक्झिमम माव्हरिक्स (राजीव संतानी व ललित सोळंकी), गोयल गंगा रियल रिच (अतुल गोयल), किंग्ज (वेरिंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), ऑल स्टार्स (हिरेन परमार व अमित परमार), फ्लिपर्स (शैलेश रांका व कुणाल सांघवी) आणि पँथर्स (मनप्रीत उप्पल व गौरव गधोके). या लीगबद्दल बोलताना पूना क्लबचे उपाध्यक्ष गौरव गधोके म्हणाले की, या स्पर्धेचे संपूर्ण स्वरूप अत्यंत रोमांचकारी व चुरशीचे असून लकी ड्रॉद्वारे एकूण 8संघांमधून प्रत्येकी 4संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन-तीन संघ आगेकूच करतील. रविवार, दिनांक 28 मे रोजी ग्रँड फायनल्सचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेबद्दल क्लबच्या सभासदांमधील उत्सुकता कळसाला पोहोचली असून पुरुष, महिला व मुले-मुली मिळून वय वर्षे 6 पासून 75वर्षांपर्यंतच्या 145खेळाडूंनी स्पर्धेतील सहभाग केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, 20 मीटर, 40 मीटर व रीले अशा विविध प्रकारच्या 52 स्पर्धाप्रकारांचा लीगमध्ये समावेश आहे.
अध्यक्ष गौरव गधोके यांच्या नेतृत्वाखाली तुषार आसवानी (स्पर्धा संचालक), तसेच शुभा गडकरी, समीर सांघवी व कुणाल सांघवी यांचा समावेश असलेल्या संयोजन समितीची नियुक्ती स्पर्धेच्या उत्कृष्ट व सुरळीत संयोजनासाठी करण्यात आली आहे.