July 27, 2024

पुण्यात येत्या १ व २ जुलै रोजी संपन्न होणार सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव

पुणे, दि. २६ जुलै, २०२३: पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार दि १ जुलै आणि रविवार दि २ जुलै, २०२३ रोजी सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील गणेशनगरमध्ये डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात दि १ जुलै रोजी सायं ५ वाजता तर दि २ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता हा महोत्सव संपन्न होणार आहे. सदर दोन दिवसीय महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.

सितार नवाज उस्ताद बाले खान यांचे घराणे ‘सताररत्न’ पदवीने ओळखले जाते. सतार हे वाद्य दक्षिण भारतात रुजविण्यात त्यांच्या घराण्याचा मोठा वाटा आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी या घराण्याचे सातव्या पिढीचे कलाकार उस्ताद बाले खान यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक व गायक रईस बाले खान हे या महोत्सवाचे आयोजन करीत असतात. सदर वर्ष हे महोत्सवाचे ५ वे वर्ष आहे.

या महोत्सवाला शनिवार दि. १ जुलै रोजी सायं ५ वाजता सुरुवात होईल. यावेळी भीमण्णा जाधव यांचे सुंद्री वादन होईल. भीमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे नातू व पंडित चिदानंद जाधव यांचे चिरंजीव आहेत. सुंद्री वाद्यास सातासमुद्रापलीकडे पोहचविण्यात भीमण्णा यांचा मोठा वाटा आहे. भीमण्णा जाधव यांचे सुपुत्र व्यंकटेश कुमार हे देखील यावेळी सादरीकरण करतील. त्यांना डॉ अतुल कांबळे तबल्यावर साथसंगत करतील.

यानंतर यावर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी उस्ताद उस्मान खान (सतार), पं विनायक तोरवी (गायन), पं रवींद्र यावगल (तबला), विदुषी आरती अंकलीकर टिकेकर (गायन) आणि पं उदय भवाळकर (गायन) यांचा फोर्स मोटर्सचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक डॉ अभय फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्षा इंदिरा सालियान आणि सचिव मालती कलमाडी आदी यावेळी उपस्थित असतील.

यानंतर विदुषी कल्पना झोकरकर यांचे गायन होईल. कल्पना झोकरकर या ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध व ज्येष्ठ गायिका आहेत. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी) हे साथसंगत करतील. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता उस्ताद उस्मान खान यांच्या सतारवादनाने होईल. यांना पं रविंद्र यावगल हे तबलासाथ करतील.

दि २ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. यावेळी भेंडी बाजार घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आणि पं. टी डी जानोरीकर यांच्या शिष्या अनुराधा कुबेर यांचे गायन होईल. त्यांना पं रविंद्र यावगल हे तबलासाथ तर डॉ चैतन्य कुंटे हे संवादिनी साथ करतील. यानंतर पं उदय भवाळकर यांचे धृपद गायन होईल. प्रताप आवाड हे त्यांना पखावज वर साथसंगत करतील. यानंतर उस्ताद रफिक खान (सतार) आणि अभिषेक लाहिरी (सरोद) यांची जुगलबंदी होईल. उस्ताद रफिक खान हे धारवाड घराण्याच्या सहाव्या पिढीचे वादक आहेत तर अभिषेक लाहिरी हे मेहर घराण्याचे सुपासिध्द सरोद वादक आहेत. अभिषेक लाहिरी यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले असून ग्लोबल इंडियन म्युझिक पुरस्कारासाठी त्यांना दोन वेळा नामांकने मिळाली आहेत. या दोघांनाही पं रामदास पळसुले हे तबलासाथ करतील. ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक विनायक तोरवी यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल. त्यांना पं रविंद्र यावगल हे तबला तर डॉ चैतन्य कुंटे हे संवादिनी साथ करतील. महोत्सवाचे सूत्रसंचालन अनघा परांजपे या करतील.