September 10, 2024

जमीन विक्रीस इच्छुक जमीन मालकांनी संपर्क करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

पुणे, 26 जून 2023: कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना शेतजमिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या जमीन मालकांना त्यांचेकडील कसण्यास योग्य असलेली जमीन विकावयाची असेल त्यांनी समाज कल्याण विभागाकडे 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

संबंधित जमीन मालकांनी विहीत नमुन्यातील अर्ज, शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठी यांचे प्रमाणपत्र, ७/१२ उतारा, संबंधित परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची तसेच कृषि पतपुरवठा करणाऱ्या बँकेचे कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र व प्रस्तावित विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

इच्छूक जमीन मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जिल्हा पुणे यांचे कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या समोर, येरवडा, पुणे- ४११००६ दूरध्वनी क्र. ०२० – २९७०६६११ या कार्यालयात अर्ज करावा, असे कळविण्यात आले आहे.