October 3, 2024

मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

पुणे, 28 एप्रिल 2023: भूसंपादनाची उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करुन मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे राहिलेले काम पूर्ण करावे. हा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, सा. बां. पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले आदी उपस्थित होते.

उड्डाणपुल कामाच्या पाहणीनंतर कार्यक्रमात मंत्री श्री. चव्हाणे म्हणाले, नवीन रेल्वे पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. राहिलेल्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया संबंधितांनी त्वरित पूर्ण करावी. या कामाबरोबरच सेवा रस्ते आणि इतर अडचणी लवकरच सोडविण्यात येतील. नवीन रेल्वे उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा उड्डाणपूल परिसरातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे काम दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशाही सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.

प्रकल्पामध्ये २५ मीटर लांबीचे १४ गाळे असा एकूण ३५० मीटर लांबीचा मुख्य पूल असून हडपसर बाजूला १४९.५.मीटर आणि मांजरी बाजूला १७४.९५५ मीटर असा एकूण ३२४.५ मीटर लांबीचा रॅम्प आहे.

यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.