May 17, 2024

ज्येष्ठ बासरीवादक पं रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप

पुणे, दि. २३ फेब्रुवारी, २०२४ : ज्येष्ठ बासरीवादक पं रोणू मजुमदार यांच्या सुमधुर बासरीवादनाने १० व्या गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे आजपासून सुरु झालेल्या या महोत्सवाला नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर, अजित बेलवलकर, समीर बेलवलकर, निरंजन किर्लोस्कर, मकरंद केळकर, गणेश जाधव, प्रवीण बधेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पं रोणू मजुमदार यांनी राग अभोगी कानडाची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ताल झपताल आणि तीनतालचे प्रभावी सादरीकरण केले. यानंतर ‘अब कैसे बने मोरी बात सजनी…’ ही जयपूर घराण्याची पारंपरिक बंदिश त्यांनी प्रस्तुत केली.

किशोरीताई माझ्याशिवाय भजन गायच्या नाहीत. अनेकदा मी एखादे रेकॉर्डिंग करत असताना त्यांनी मला बोलावून घेतले आहे, अशी आठवण सांगत पं रोणू मजुमदार म्हणाले, “मी किशोरी ताईंना अगदी जवळ होतो. त्या जेवढं रागवायच्या तेवढेच प्रेमही करायच्या. त्यांचे मन साधे, हळवे होते. त्या सूर आणि संगीताविषयी अगदी छोट्या छोट्या गोष्टी मात्र गहिऱ्या गोष्टी बोलायच्या. त्यांचे बोलणे आणि गाणे दोन्ही ऐकताना आम्ही कलाकार आणि श्रोतेही अक्षरशः समाधीत लीन व्हायचो.” आज त्यांच्या नावाने सुरु असलेल्या महोत्सवात सादरीकरणाची मिळत असलेली संधी माझ्यासाठी सेवा आहे असेही पं रोणू मजुमदार म्हणाले.

पं रोणू मजुमदार यांना पं रामदास पळसुले यांनी दमदार तबलासाथ केली. तर शुभम खंडाळकर (तानपुरा), कल्पेश सांचला (बासरी) यांनीही समग्र साथसंगत केली.

विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

उद्या महोत्सवाच्या दुसऱ्या (शनिवार दि २४ फेब्रुवारी) दिवसाची सुरुवात सायं ५ वाजता सौरभ काडगांवकर यांच्या गायनाने होईल. यानंतर ज्येष्ठ गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायन होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप सुप्रसिद्ध सतारवादक पं नीलाद्री कुमार यांच्या सतार वादनाने होईल.