May 17, 2024

उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे, 22 फेब्रुवारी 2024: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी.) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील (इ. १० वी) गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता समितीच्या अंतर्गत भरारी पथकांची नियुक्ती, कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासह परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी.) आणि १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) आयोजित केलेल्या आहेत. या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.

परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घेडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात सीआरपीसी- कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश पारित करून परीक्षार्थीच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना तहसिल कार्यक्षेत्रामध्ये सर्व परीक्षाकेंद्रावर भरारी पथके तयार करण्याबाबत आदेश दिले असून कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

प्रत्येक परीक्षा केंद्रानजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना त्यांच्या हद्दीमधील शाळांसाठी भरारी पथके नियुक्ती करण्याबाबतही कळविण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक, योजना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचीही भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथकही पूर्णवेळ उपस्थित राहणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. कॉपी व तत्सम गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित केंद्र संचालक व संबंधित व्यक्तींवर तात्काळ शिस्तभंग कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत, अशी माहिती कमलाकांत म्हेत्रे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिली आहे.